डास

गोष्ट लिहायला लागलो तेव्हा
मनात आलं तसं लिहीलं, मग मागे वळून पाहण्याचं धैर्य झालं नाही आणि कारणही उरलं नाही.
एक क्षण मनात विचार आला कुठेतरी, कधीतरी, आणि आलं ते कागदावर उतरत राहिलं, उडत, मनसोक्त!
एकेक ओळ लिहीताना जाणवणारा वारा आणि मनातले कारंजे थांबता थांबले नाहीत. एकेक ओळ लिहीताना
मनात जुळणारी लय, कविता, गाणी काही थांबली नाहीत. त्या आनंदात मी जे लिहीलं ते लिहीलं.
ते तेवढ्यावरच माझं मन भागलं कारण त्या-त्या वाक्यांमधे अजून काही उत्कृष्ट करावंसं
जाणवलं नाही. जे जसं लिहीलं तेवढ्यावर पोट भरलं माझं आणि त्याहून अधिक काहीच नाही.
ही प्रक्रिया किती सोपी आहे? जणू उडणारं फुलपाखरू किंवा गाणारा पक्षी एखादा. जणू उन्हात
पडलेली मगर आs वासून किंवा वाहणारी नदी निवांत. घडणारं घडतं आणि तो क्षण तेवढाच अधांतरी
उरतो. त्याला मागे-पुढे काही नाही. त्या-त्या कल्पनांची कादंबरी होत नाही की त्यांचं
लोणचं घातलं जात नाही. एकलकोंड्या अशा कित्येक कल्पना विस्ताराशिवाय पडून राहिल्यात
आणि त्याबद्दल विशेष विवंचनाही कुणाला नसावी! या कल्पनांना पिल्लं होत नाहीत, त्यांची
भूतं होऊन आम्हाला झपाटत नाहीत. त्यांचे लागेबांधे आम्हाला रहात नाही आणि त्यांचे पत्ते…त्यांना
घरं नसतात; भौतिक परिमाणांमधे खिजगणती नसते त्यांची!  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *