कविता


तुझ्या चांगल्या वाईट सवयींचा
ठिकाणा हळूवार हरवत चालल्यासारखा होत असताना, मी आताशा घराचे दार उघडून आत पाय ठेवला
तर हवेचा थर तिथल्या तिथे. हालचाल नाही, रंग नाहीसे. अंधाऱ्या रात्री, मिणमिणत्या प्रकाशात,
गच्च पावसात, आभाळ उतरण्याची वाट पाहत आडोश्याला बसलेल्या साठीच्या तेलकट चेहऱ्याच्या
माणसासारखं घर बसलेलं असतं, गच्चीतून तोंड काढून रस्त्याकडे बघत…तुझी वाट बघत!

मी गाडीच्या चाव्या खिळ्याला
अडकवतो, खिशातलं पाकीट ड्रॉवरवर मधे ठेवतो. खांद्यावरचं ओझं खुर्चीवर ठेवतो आणि गच्चीत
येऊन उभा राहतो. सात किंवा असे काहीतरी वाजलेले असतात. लोकं दिसतात…घरा-घरांत खुर्च्यांवर
बसलेली, बसवलेली; चहा पिणारी; टिव्ही बघणारी; येणारी-जाणारी; चित्रातल्यासारखी. तू
नाहीस दिसत. घर घरात जाऊन बसून घेतं, करायला विशेष काहीसं नाही!

थोडं बसावं, एक-दोघांना
फोन करून उगाच त्रास द्यावा, कामाचं बोलावं. करमेनासं होतं. पक्षी आढळत नाहीत, भिंतींवर
अडकवलेले तुझे-माझे फोटोजही बोलत नाहीत. तुझी आठवण येत नाही, त्रास होतो. घरातल्या
फरश्या दररोज मोजल्या तरी तेवढ्याच राहतात आणि तू असताना घर कसं एकदम छोटंसं वाटतं
तेही उमगत नाही! मी घर आवरून ठेवतो. तुला चांगलं वाटेलंसं ठेवतो.

पाऊस थांबल्यासारखा साठीचा
म्हातारा, माझ्याजवळ येऊन बसतो. आम्ही एकमेकांकडे बघतो. मी आम्हा दोघांच्या पेल्यात
मद्याचे पेग भरतो, चिअर्स करत नाही, निमित्त नसतं. घरातला प्रकाश मंदावतो, मी नोराह
जोन्सची गाणी लावतो. आम्ही दोघेही पुन्हा गच्चीत जाऊन उभे राहतो, तोच तो रस्ता बघतो,
आकाशात चंद्र चढलेला असतो. घराला एक आणि मला एक दीड-फुटाची फरशी एवढीच गरज उरते…बाकी
उरतो तो निव्वळ पसारा!

तुझी वाट पाहणारा पंकज
१७ ऑगस्ट २०१९


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *