पानगळ

तू नसताना
लागते पानगळ
मनाच्या सागवनाला.
पाचोळ्याचा आवाज
दऱ्यादऱ्यांमधून
घुमतो
केविलवाणा!

झळा उन्हाच्या
करपवत जातात
उरलासुरला चारा.
विचारांची गुरंढोरं
दुष्काळ नसून
असल्यासारखी!

पायवाटा झाकलेल्या
बोडके डोंगर
पिवळसर धरती.
झरे आटलेले
हळद्याच्या गाण्यात
माझेच स्वगत!

तळपत्या उन्हात
वणवा पेटतो एखादा
भस्मसात क्षणात!
तू नसताना
नाही थंड वारा
फुलांच्या गारा!

तू नसताना
पळस उगाच फुललेली
सावर लालेलाल!
तू नसताना
शुष्क ओढ्याकाठी
रातवी पौर्णिमा!

तू नसताना
लागते पानगळ
मनाच्या सागवनाला
ये ना अशी इकडे
ऋतूबदल
अधीर मनाला!
– पंकज (०८.०३.२०१८)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *