चित्र

पायरीवर बसलेली ती आकाशाकडे
टक लावून बघते. कुणीतरी येणार. कोण असेल? कसे असेल? कधी येणार? शक्यता अगणित आणि तिच्या
असंख्य विचारांना फुलपाखरांचे पंख; हात लावला की अद्रुश्य होणारे.

ती अशी बसलेली असताना तिच्या निळा बटांनी
तिच्या वक्षस्थळावर जमवलेली वेलांटी आणि तिच्या
कानातल्या पाखरांना गोंजारणारी हवा यामधेच
आयुष्य जगता येतं
का याचा केविलवाणा
प्रयत्न करणारा वेळ.

ऊनाचा चटका डोळयाला असहय्य होऊन ती उठते आणि तिचा
पाचूच्या रंगाचा पायघोळ झगा हातांनी
सावरत दोन पायऱ्या
खाली उतरते, जमिनीवर अवतरते.

सुस्कारात्या पायरीचा ज्यावर ती बसली
होती. जिथे राणीचे पाय लागले ती पायरी
सोन्याची झाली, इथे तर राणी किती वेळ
बसून होती माझ्यावर
म्हणून ती पायरीही
गुलाबीसर झालेलीसोन्यावरती
चढलेली लाली.

नोराहच्या इवलाल्या गिरकीत तिच्या बांगड्या किणकिणतात. तीन गिटारींच्या पाच तारा आळवतात, सितारीची एक रेघ
उमटते, विजांचा कडकडाट
होतो आणि एक अनामिक धून कळतनकळत लवलवते. 

ती पुन्हा एकदा आकाशाकडे
बघते. कसा ओळखावा तिच्या मनातला गुंता? बर्फाळलेले पर्वत
समोर, फुलांचे गालिचे
तळव्यांखाली आणि तिच्या
झग्याभोवती गुंफलेला वेळ. अशा या चित्राला ना सुरूवात
ना अंतआकाशातून
अवतरणारी कल्पनांची पाखरं डोळ्यांसमोर फक्त!    

– पंकज । ९ एप्रिल २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *