चुरगळा

 

…तर हा माणूस दररोज सकाळ-संध्याकाळ एकच अंडं खायचा. त्याच्यावरतीच
त्याचा संसार चालायचा. फिक्कट निळा पुर्ण बाह्यांचा शर्ट आणि त्यावरती गर्द निळी पॅण्ट,
असा साधारण त्याचा वेश, दररोज ठरलेला असायचा. कधी-मधी पांढरा शर्ट घालायचा, आय़ुष्यात
विशेष काही बदलायचं नाही. लांबून बघितलं तर वाटायचं की रंजला-गांजलेला दिसतो बुवा,
मनात मोठं दु:ख जगतोय; काहीतरी आतल्या आत खात असेल त्याला, म्हणून असा खंगल्यासारखा
दिसतोय, एकाच अंड्यावर जगतोय. तो सरकारी किंवा बॅंक कर्मचारी नव्हता, लेखक किंवा कलाकार
नव्हता; तो चतुर्थ श्रेणी कामगार नव्ह्ता की कुठल्या कंपनीचा मालक नव्हता. पण त्याचं
एवढसं वर्णन सांगितलं तरी वाटायचं की या चार-पाच ओळखी असाव्यात त्याच्या. त्याच्या
कामाशी तसा काही आपल्याला मतलब नाही. त्याचा वर्ण? कसा असावा वाटतं तुम्हाला? काळा,
सावळा, गोरा? त्याची अंगकाठी? बारीक, मध्यम, स्थूल. त्याची उंची? ठेंगणा, मध्यम, उंच.
त्याचे केस? त्याचे डोळे? त्याचं बोलणं? त्याचं जग?

तोडक्या-मोडक्या माहितीवरून एवढ्या लांबवरचा पल्ला गाठायचा
म्हणजे सोप्पे काम नाही. म्हणून मग एखादा चालता-बोलता माणूस पकडायचा आपल्याच जगातला.
जिवंत, मृत, किंवा आठवणीतला. आपलं मन, आपला मेंदू किती copy paste करत असेल याचा आपल्याला
काहीच थांगपत्ता लागत नाही, generally. तर हा माणूस, जो फक्त एकच अंडं सकाळी आणि संध्याकाळी
खायचा, काय असेल त्याची story? कुठे धडपडला असेल, कुठे ठेच लागली असेल, की नेहमीप्रमाणे
मागल्या आयुष्यात चुकांचं सारवण घातलं असेल? जे सोयीस्कर, जे वाटतं मनाला छान, ते चिकटवावं
आयुष्य आपण आपल्या कागदावरच्या व्यक्तीला.

मग असं सगळं खोटं-नाटं करून कशाला लिहीत बसायचं त्यावर?
Timepass म्हणून? की स्वत:ला विचारांत झोकून देण्यासाठी? त्या गर्द गार समुद्रात विचारांच्या,
असंख्य अशे अद्भुत आणि अनामिक तळ शोधण्यासाठी. मग हा एकच अंडं खाणारा माणूस का? तुमच्या-माझ्या
पायातला surfing board म्हणून अशाच व्यक्ती उपयोगी पडतात. ते unexplored तळ शोधताना
स्वत:चा श्वासही घुसमटतो आणि नकळत त्या लिखानाची नशा भिनत जाते शरीरात. मारलेल्या त्या
लांबलचक सूरात, भेटतात अजून कित्येक लोक, प्रसंग, भावना, आणि शब्द. त्या दुर्गम भागात
अन्नसाखळी असते आणि त्याचा आपणही असतो एक घटक. कधी त्या अन्नसाखळीच्या पिरॅमिडच्या
टोकाला, कधी पायथ्याला, कधी सॅण्ड-विच्ड, तर कधी मृतजीवी म्हणून. कुठे का असेना, आपणही
असतो एक भाग त्यांच्या जगाचा.

तर तो एकच अंडं खाणारा माणूस. या एका ओळीतून कीव व्यक्त होते
का? की रहस्यमय कथा वाटते? असं पण वाटतं की मारलाय टोमणा. लिहीण्याची भाषा आणि व्यक्त
होणारी भावना, यांचा ताळमेळ नाही जुळला की होतो तो हशा. आता तळ गाठून मी परतीचा प्रवास
केलाय सुरू. त्याच त्या व्यक्तीला पकडून उलट्या दिशेने. त्याच्या भूतकाळात डोकावून
पाहताना किती सुंदर गोष्टी दिसतात, पण आपण करायचा कानाडोळा. कारण आपल्या पांढऱ्या कागदावर
ती व्यक्ती बनवायचीय नैराश्यमय. आपण त्या ओळींमधे पकडतोय का पात्रांची जगं? एवढ्या
कमी अवधीत नसेलही शक्य, पण तो एकच अंडं खाणारा माणूस डोक्यात जसा बनलाय हाडामांसाचा
तसाच उतरलाय का कागदावर याचं प्रामाणिक उत्तर सापडणं अशक्यच!

पंकज

१९ एप्रिल २०२१    

चित्र

पायरीवर बसलेली ती आकाशाकडे
टक लावून बघते. कुणीतरी येणार. कोण असेल? कसे असेल? कधी येणार? शक्यता अगणित आणि तिच्या
असंख्य विचारांना फुलपाखरांचे पंख; हात लावला की अद्रुश्य होणारे.

ती अशी बसलेली असताना तिच्या निळा बटांनी
तिच्या वक्षस्थळावर जमवलेली वेलांटी आणि तिच्या
कानातल्या पाखरांना गोंजारणारी हवा यामधेच
आयुष्य जगता येतं
का याचा केविलवाणा
प्रयत्न करणारा वेळ.

ऊनाचा चटका डोळयाला असहय्य होऊन ती उठते आणि तिचा
पाचूच्या रंगाचा पायघोळ झगा हातांनी
सावरत दोन पायऱ्या
खाली उतरते, जमिनीवर अवतरते.

सुस्कारात्या पायरीचा ज्यावर ती बसली
होती. जिथे राणीचे पाय लागले ती पायरी
सोन्याची झाली, इथे तर राणी किती वेळ
बसून होती माझ्यावर
म्हणून ती पायरीही
गुलाबीसर झालेलीसोन्यावरती
चढलेली लाली.

नोराहच्या इवलाल्या गिरकीत तिच्या बांगड्या किणकिणतात. तीन गिटारींच्या पाच तारा आळवतात, सितारीची एक रेघ
उमटते, विजांचा कडकडाट
होतो आणि एक अनामिक धून कळतनकळत लवलवते. 

ती पुन्हा एकदा आकाशाकडे
बघते. कसा ओळखावा तिच्या मनातला गुंता? बर्फाळलेले पर्वत
समोर, फुलांचे गालिचे
तळव्यांखाली आणि तिच्या
झग्याभोवती गुंफलेला वेळ. अशा या चित्राला ना सुरूवात
ना अंतआकाशातून
अवतरणारी कल्पनांची पाखरं डोळ्यांसमोर फक्त!    

– पंकज । ९ एप्रिल २०२१

लिखान

कसे लिहावे बरे? बरं लिखान तसं सोप्पच! थोडे-थोडे शब्द गोळा करावेत. कशाला काय जोडायचे याची मनातच करावी मांडणी. आणि सर-सर सारे ओतावेत शब्द कागदावर. ओतण्याची पण एक कला आहे. ज्याला जमली त्यालाच माहिती की ती जादू कशी घडते! 

ओतावेत शब्द कागदावर आणि हळूवार मारावी एक फुंकर अनुभवाची, मग पसरतात ते आपोआपच; जसा पसरतो जमिनीवर ओतलेला पारा! आपोआप, नेमके, अर्थपुर्ण. असे जमले प्रकरण की कशाला त्यांना हलवायचे? जे आहे ते तसेच ठेवायचे आणि दुरून थोडे बारकाईने बघायचे. 

वाटतं मग, अरे हा एक शब्द फारच अवखळ, पसरलाय कागदभर, तर हा दुसरा अगदीच लाजाळू. वाटतं, अरे ही काही वाक्यं आगगाडीसारखी लांबडी, तर काही अगदीच झालीत पोरकी! वाटतं असंही की काही जमलं नाही हे चित्र चांगलं, करावा कागदाचा बोळा; तर कधी (क्वचितच बरं का) वाटतं, जमलंय बरं का! 

काही का वाटेना; आताशा मनातलं कागदावर येणं हीच केवढी मोठी प्राप्ती! काही शब्द असावेत खिशात पांढरे-काळे, रंगी-बेरंगी; काही वाक्यं बनवावीत लहान-मोठी, सुरेख नि वेढब. कोऱ्या कागदावरती चित्र मात्र रेखाटताना मनाशीच जुळवावं एक गाणं, आणि एक ललित जन्माला घालावं तान्हं. 

पंकज । २० डिसेंबर २०२०       

लॉकडाऊनचे उच्छवास!

दिवस मावळतो, मग उजाडतो; तसा काळाच्या चक्रात अडकलेला नादान जीव खुळावतो. इथेतिथे आणि पुन्हा तिथेच असा पायांचा प्रवास घरभर होऊन घरातच थांबतो. आतापर्यंत खरं मोजून झाल्यात फरश्या किती,
घराची व्याप्ती किती, आणि आपली लायकी किती! पोपट आहे पिंजऱ्यामधला आमच्या घरी. उदास बसून असतो तो. मिरच्या खातो,
पेरू खातो,
आणि कर्कश्श भाषेत (शिव्या) बोलतो आमच्याशी. त्याचे पंख अधूनमधून कातरले की उडण्याची इच्छाही जाते त्याची कातरली; आणि पिंजऱ्याच्या आत काय, बाहेर काय,
फरक कळेनासा होतो.
वाटलं नव्हतं हवा एवढी प्रदुषित होईल की घराबाहेरही पडता येणार नाही. संशयी नजरेने समोरच्या व्यक्तीला पहावे लागेल आणि चारहात लांबच रहावे लागेल. ते प्रत्यक्ष घडताना पाहिल्यावर विश्वास बसतो. तरी आम्ही कित्येक वर्षांपासून बोंबलून सांगत राहिलो की वातावरणबदल म्हणजे मज्जा नाही; आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारत चाललोय. विञानधिष्ठ बुद्धीला पटलेल्या या गोष्टी जगाने कधी मनावर घेतल्याच नाहीत, मग हा असा फटका बसला तर जबाबदार कोण?
जबाबदार आम्हीच! आम्हीच कापल्या वेली,
आम्हीच जाळली धरणी आणि धूर झाला तसा नाकाला लावला रूमाल. आम्हीच केली जंगले रिकामी; तुकारामांच्या सोयऱ्यांच्या सोयिस्कररित्या केल्या कत्तली, आणि अभिमानाने मुर्खत्वाची शिखरे सर करत गेलो. वन्यजीवांच्या लचक्यांवरती केले राजकारण; नाकारले आदिवाशांचे हक्क;
नदीसमुद्रभुमीला हवे तसे लुटलेखरवडलेओरबाडलेचावलेचाटले. आपले दात छोटे आणि खोटे, म्हणून वाचले काही,
पण जे गेले ते परत येत नाही!
आता मी दिवसभर फिरतो एका बंद घरात आणि मनातून दाखवतो की मी केले काहीच नाही!
आतली तळमळ बाहेर सांगणार कुणाला? ज्यांना सांगणार त्यांनाही कळतंच हे सारं!
तसं पगारी काम आहेच; त्यामुळे जीव रमतो.
माझा विद्यार्थी आणि प्रॉजेक्टसचाच गोतावळा सांभाळण्यातच दिवस संपतो. पण एक मन म्हणतं, अरे वा!
लॉकडाऊन मधे आपण अति-productive काम करू! आजवर ठरवलेल्या बऱ्याच pending गोष्टींचा फन्ना उडवू.
किती लिहायचंय, करायचंय; सगळंसगळं करूनच टाकू.
ते दुसरं मन, मी घरी नसतानाही हेच म्हणायचं! कुणी म्हणतं, लॉकडाऊनचा वेळ सत्कर्णी लावा; लॉकडाऊन enjoy करा! पण नाही ही परिस्थिती enjoyable! परिस्थिती फक्त घरी बसण्यापुरती नाही. घरी बसणं ही फक्त क्रिया, पण त्यामागे कायकाय घडलंय ते पाहून मन विदीर्ण होतंय. आपल्याच कर्माने घरी बसलेलो आहोत आपण.
अगदीच हातात काम नसलेले काय करत असतील अशा काळात? पंख कातरलेले पोपट,
शुन्यात पाहत राहतील. मालक कधी मिरची देतो, पेरू देतो, वाट पाहत असतील. अशा विनाकारण गुंत्यात अडकलेले प्राणी आपण!
गुंताही केला आपणच! तो सोडवायला टोकंही सापडत नाहीत आता!
घरोघरी तशेही मोबाईल आणि टिव्हीला चिकटलेले आत्मे, राबराब राबणारे आत्मे, आणि इतरांना कामाला लावणारे आत्मे असे सारेच एकत्र येऊन जे तांडव सुरूय त्याबद्दल खरंच कुणी कसं लिहीत नाही?
कितीशी लोकं असं दिवसभर एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकतात बरं? कामाची सवय झालेली लोकं, हातातून काम अचानकच सुटल्यावर किती हतबल झाले असतील आणि ती सगळी चिडचिड, तिला मोकळं व्हायला मार्गही नाही!
मातीत काम करणारे हात वर्क फ्रॉम होमकसे करणार बापुडे? कामाला देव मानणारी भाबडी मनं दिवसातले चारचार तास टिव्हीला चिकटून कशी राहू शकतील बरं?
आणि ज्या लोकांसाठी घर ही आरामाची जागा असते,
ते आरामात आराम तरी कसा करू शकणार? लॉकडाऊनचे साईड ईफेक्ट्स सगळ्यांनाच झेपणार नाहीत!
कधी वाटतं घरात एवढ़्ढं आपण कधीच राहिलो नव्हतो. अतिशय जास्त घरात राहून लोकांविषयी अतीच माहिती मिळते की काय अशी धास्ती वाटते. Personal
space
जपलेली, हळूहळू उद्धस्त होतेय की काय अशी शंका निर्माण होतेय. ज्यांना या गोष्टी कधी झेपल्या नाहीत, त्यांना तसाही काही फरक पडत नाहीत. पण आताशा घरातल्या सर्वांच्याच झोपण्याउठण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा आणि जेवणातले मेन्यु, स्वभाव आणि पादण्याच्या पोझिशन्स आणि नाद यांचा इत्यंभूत डेटाबेस डोक्यात तयार होत चाललाय. हे असं माणसांचं जग अतिजवळ आलं की त्यात कसं रहावं हे उमजणं ही खरी एक कला आहे, पण मला ञात नाही. मी हे जग बघतोय, अनुभवतोय!
एक मात्र खरे की शनिवाररविवार च्या चक्रातून हा जीव मुक्त आहे; आता दररोजच मंगळवार किंवा गुरूवार असा काहीसा असतो.
तारीख आणि जगातल्या मृतांचा आकडा या दोन्ही संख्यांवरची अंधश्रद्धा मी झटकून दिलीय आणि बिनातारखांच्या आणि बिनावाराच्या काळाच्या अक्षावरून प्रवास सुरू झालाय खरा! या अक्षावरती डेडलाइन्सचे गतिरोधक आहेत जिवंत, पण त्या प्रवाशी मनाला सणसमारंभाचे अप्रूप नाही आणि हारतुऱ्यांची आस नाही!
दररोज ढिगभर ऑनलाईन मिटींग्ज आहेत, पण माईक आणि व्हिडीओ स्विच ऑफ करून सच्चिदानंदी
टाळी लागण्याची सोयही आहे. आळसाचं जेनेसिस खरंतर न आवडणाऱ्या गोष्टी वेळेत करण्याशी
आहे!  
     पंकज
१७ एप्रिल २०२०

मऊशार

बॉसचा असहाय्य त्रास आणि लागून
आलेला लॉंग वीकेंड
असा दुग्धशर्करा
योग आल्यावर सोबतीण म्हणाली, कीक मार गाडीला आणि चल जाऊ दूरदेशा गड्या! गडी काय तयारच एक पाय
कीकेवर ठेवून! जाऊ तर जाऊच, फेसाळलेल्या पाण्यात
देवमासा बनून, समुद्राची मातीही
खाऊ! कसं जायचं, हे ठरलेलं. साधीशी बजाज डिस्कव्हर
११० सीसी. तिला मस्त सर्विसिंग, ऑयलिंग करून आणलं. गुगल मॅप्स उघडून ठिकाणं शोधली, रस्ते पाहिले, स्वत:चे रूटस तयार केले
आणि मनातल्या अपुर्वतेच्या कप्प्यात वाटेतल्या गावांची नावे सांभाळून
ठेवली. प्रवास पक्क्याकच्च्या रस्त्यांवरून जरी असला
तरी कल्पनेच्या वाटांवरचा; ती गावं निव्वळ पात्रं त्यामधली. एक सोबर पिकची बॅग घेतली; तिला रिकामीच उचलली तशी ती थोराड मोलकरणीसारखी वाटली. धूळ,
पाऊसपाणी, थंडीवारा, असल्याच तर गाराही
झेलून घेईन जिद्दीने
आणि पाठ सोडणार
नाही गाडीची तुमच्या, असं म्हटली ती. मग म्हटलं, चल गं बाई, तुझ्याशिवाय कुणीच
या प्रवासाच्या लायकीचं नाही! डोळे झाकून चिंतन केलंकुठे
जाणार, काय करणायं, याची एक अनएडिटेड
चित्रफित डोळ्यांसमोरून फिरवली आणि बॅगेत
काय भरायचं हे मला
आणि तिलाही सांगितलं. एक बॅग, दोन ऑक्टोपस, एक गाडी, आणि दोन प्रवासी, निघालो प्रवासाला.

प्रवास आम्ही दिवसांमधे आणि किलोमीटर्स
मधे तसा मोजला
नाही, तो येणाऱ्या दऱ्याखोऱ्यांमधे
आणि झरे आणि
नद्यांमधे विणत गेलो. मागच्या काही प्रवासांत
झालेल्या पाठीच्या आणि अंगदुखीमुळे
पिलीयनच्या भुमिकेत खरं तर मैत्रीणीला जायचं नव्हतं, पण तिला इतर काही पर्याय
नव्हता. थांबतथांबत, आरामात आम्ही निघालो. पुणे ते भोर, पहिला टप्पा. मधे सुंदरसा
लागणारा नेकलेस पॉईंट. निरा नदीने घेतलेली वक्राकार फिरकी आणि तिच्या
त्या फिरकीवर भाळलेला घाटाचा टप्पा, म्हणजे तो नेकलेस पॉईंट. अतिशय नयनरम्य देखावा, इतरवेळी सहजच
हरवून बसलो असतो, पण दिसला आणि मन प्रसन्न झालं. बहुधा बऱ्याच चित्रपटांमधे इथली दृश्य
आहेत, बहुधा!
भोरकडे जाताना पाण्यानं बहरलेली निरा नदी
आणि मग लागणारं
भाटघर धरण. पाण्यानं संपन्न
प्रदेशातून फिरताना मन तजेलदारच
राहणार. त्याहून पुढचं
आकर्षण म्हणजे लांबलचक
आणि निर्मनुष्यसा वरंधा घाट. निरादेवघर धरणाला लागून असलेला घाटाचा रस्ता. मधे सतत ऊनसावलीचा
खेळ, थंडसं वातावरण. दूरदूरवर
अगदीच कुणी नाही. ना गाव, ना घर, ना दुकान, ना पेट्रोल पंप. सकाळी निघतानाच टाकी फुल केलेली
असल्यामुळे पेट्रोलची काहीच चिंता नव्हती. निर्मनुष्य रस्ता, तेही जंगलाच्या अंतरंगातून जाणारा, म्हटल्यावर मला
अतिशय जास्त हुरूप आलेला.मजलदरमजल करत, मधेच एखाददुसरा रस्ता चुकत शेवटी
दापोलीच्या रस्त्यावर लागलो. ऊन डोक्यावर आलं तसं, खेड रस्त्यावर माजलेकरांकडे जेवण केलं
आणि ऊन्हाचे चटके खात, आमचं ओयो शोधतशोधत मुरूडच्या बीचजवळ पोहोचलो. खरं कोकणातल्या समुद्रकिनारी ओय़ोमधे रहाणं म्हणजे मुर्खपणाचंच लक्षण, अशी ञानप्राप्ती अचानकच झाली आम्हाला! मग काय? ते ओयो दिलं झटकून आणि शोधलं
एक छानसं कॉटेज. बस्तान माडलं आणि रात्र होण्याची वाट पाहिली. रात्रीच्या अंधारात, समोर सुंदरसा आणि स्वच्छसा मुरूडचा किनारा, पौर्णिमेकडे झुकलेला
चंद्र, आणि दोन थकलेभागलेले
जीव चटईवरती आडवे पडून
आकाश निरखत असलेले दिसले. आकाशात प्रतिबिंबही दिसतं स्वत:चं कधीकधी, सप्तर्षी आणि ध्रुवतारा
व्यतिरिक्तही! तुटत्या ताऱ्याला
पाहण्याच्या आशेत सखी
आकाश निरखत बसलेली आणि मी असंख्य ताऱ्यांना जोडून झेनटँगल करण्याच्या प्रयत्नात. “What are the odds? की या क्षणी आपण या वेळेस, आकाशाच्या इतकुश्या
तुकड्याकडे बघत बसलोय
जाड भिंगांच्या चष्म्यातून आणि आपल्याला
वाटतंय की एखादा
निखळणारा तारा दिसेल
आणि तो कैक
प्रकाशवर्षे दूर बसलेल्या
बिनकामाच्या दोन व्यक्तींच्या
मनातल्या (मनातल्या बरं
का!) इच्छा पुर्ण करेल!” सखीने दाखवलं एक शेळपट लाल दिवे
मिचमिचवणारं बेकार विमान आणि म्हटली, “ते बघ तो तुटता तारा! Assume की हाच
आहे तो तुटता
तारा आणि माग
तुला जे हवं
ते!” काय तो थोर विचार! पण
looking at odds,
म्हटलं, हे तर हे सही. नशिबाला दोष
देत आणि स्वत:लाच कमी लेखत
का जगावं? लेखक म्हणून विमानालाच तुटता तारा बनवावं. ठीकंय. मागितलं,
“Let this be forever!
हा क्षण आहे तसाच
राहो!” आणि दिसला जी तुटता तारा!!! कधी मी नि तिनेही पाहिलेला. त्या सेकंदभरात, कुठली मागू आम्ही इच्छा? त्या अवाढव्य ताऱ्याच्या चितेवरती स्वत:च्या
इच्छा भाजण्याचं धैर्य आणि जाणही
नाही आमच्यात! निखळला तारा, पण जुळवल्या
त्यानं मनाच्या तारा!

मुरूड, कर्दे, अंजर्ले करत
आम्ही बाणकोटमार्गे वेळासला पोहोचलो. समुद्रकिनारी वाळूवरती
अनवाणी पायांनी चालण्यात जी मजा
आहे तिला तोड
नाही, सखीनेच शिकवलं. काही वर्षांपुर्वी
चांदोलीच्या राम नदीमधे
पाण्यात पाय सोडून
बसलेलो, बहुधा याच वेळेस, आणि ते जे निखळ सुख
होतं ते पुन्हा
कधी प्राप्त नाही झालं. त्या पाण्यात गाणी होती, त्याच्याएवढीच तिही जुनी
होती! मुरूडच्या आणि
अंजर्लेच्या किनाऱ्यावर चालताना, मऊ वाळूत उमटणारी पावलं आणि वाळूचा
थंडसर सुखद स्पर्श
वेडावून टाकणारा. दोन्ही किनाऱ्यांवरती ऑलिव्ह रिडले कासवं घरटी बनवतात. त्यात अंडी टाकतात. कासव मादी मैलोनमैल
प्रवास करून या किनाऱ्यांवरती येते, रात्रीत खड़्डा
खोदून अंडी टाकते, खड़्डा बुजवते आणि समुद्रात
विलीन होते. त्याच किनाऱ्यांवर बिनडोक्याच्यी पोरं बाईक्स
आणि कार्स चालवताना पण दिसली
आणि आपण आपल्या
निर्बुद्धपणाची लक्तरं कशी जगभर
घेऊन फिरतो याचं अप्रूप
वाटलं. माझ्या कित्येक प्रवासांत बिनडोक्याचे पर्यटक हेच खरे
निसर्गाचे विध्वसंक आहेत, हे सतत पटत आलंय.बाणकोटचा किल्ला असातसाच
आहे, पण तो जिथं उभा आहे, तिथून कुठेकुठे
नजर पोहोचते काय सांगू? मस्त सड्यावर उभा आहे. दापोली सोडल्यापासून पेट्रोल मिळालेच नाही कुठे, त्यामुळे पेट्रोलच्या शोधात बरंच अंतर
कापलं. बऱ्याच चौकशीअंती बाणकोटच्याच किल्ल्यावर शिवकालीन पेट्रोलचे भंडार आहे, असे बऱ्याच लोकांनी सांगितले. त्याच्या शोधाअंती
घबाड सापडलं, पण तेही एक निव्वळ लीटरभर आणि बिसलरीच्या
बाटलीत. ‘हर हर महादेवम्हणत टाकीला त्या पेट्रोलचा अभिषेक घातला आणि वेळासच्या
वाटेला लागलो. वेळासची वाट
फारच लोभस. उजव्या बाजूला खडकाळ किनाऱ्याचा समुद्र आणि डाव्या
बाजूला टोलेजंग पर्वत. त्या रस्त्यावरच दहा फेऱ्या माराव्यात आणि जीवनाचं
सार्थक करावं, इतका सुंदर रस्ता. आम्ही पोहोचलो त्यादिवशी सकाळीच ऑलिव्ह रिडलेची २१ पिल्ले
वनविभाग, सह्याद्री मित्र मंडळ आणि
गावकऱ्यांच्या सहाय्याने समुद्रात सोडली होती. अंजर्लेवेळासमधे दरवर्षी मार्चएप्रिल
दरम्यान टर्टल फेस्टिव्हल असतो. शाश्वत पर्यटनाचे उत्तम मॉडेल, म्हणजे हा उत्सव. आम्ही वेळासला जास्त वेळ थांबू
शकलो नाही, पण त्या लोभस रस्त्याला फ्लाईंग किस देत, वेसवीच्या जेट्टीवर जाऊन फेरीची
वाट बघत थांबलो. निवांत ती फेरी
आली, तिच्यात बाईक
चढवली आणि त्या
फेरीने आम्हाला बागमांडलाच्या जेट्टीवर सोडले. बागमांडलाच्या त्या
जेटटीवर मग आम्ही
पुढचा खेळ मांडला.


बागमांडलाहून आम्ही गेलो हरिहरेश्वरला.
कर्दे, मुरूड,
अंजर्ले, वेळास सारखे सुंदर किनारे पाहून आल्यावर हरिहरेश्वरच्या कमर्शियल किनाऱ्यावर जाण्याची इच्छाच झाली नाही. किनाऱ्याकाठचं महादेव मंदिर, किनाऱ्यावर प्लास्टिक
अस्ताव्यस्त, प्लास्टिक सारखीच
लोकंही, आणि जवळच्या एका किनाऱ्यावरती सुरूच्या बनात दारू
पीत बसलेले सुजाण नागरिक. हरिहरेश्वरला मोबाईल
फोनला नेटवर्क आलं आणि
आपण मनुष्यजातीजवळ पोहोचलो म्हणजे प्रदुषण असणारच असा शोध
लागला. हरिहरेश्वरला अतिप्रचंड होळी पाहिली. तिच्ह्याभोवती काही मंत्र
पुटपुटले गेले, तिला पेटवण्यात आलं, आणि लोकं निघून गेले. इवलालं रान जळलं आणि त्याचं
मरणं आम्ही सर्वांनी enjoy केलं.
हरिहरेश्वर आम्ही सकाळी लवकरच सोडलं आणि मस्त
माणगावताम्हिणीपौड मार्गे पुण्यात दाखल झालो. एक लांबचा प्रवास संपला. काही फोटोज काढलेले; सखीने काही व्हिडीओज काढलेले. ती म्हटली, लिही तू काही. लिहीणार नाही, असं होणार नाही.

२०२० सालातला हा प्रवास
पुन्हा कधी घडेल, मला माहिती नाही. मला जे वाटलं, जाणवलं,
ते पुन्हा कुणाला जाणवेल, ते ही ठाऊक नाही. मला आणि सखीला दिसलेला तुटता तारा आणि
त्याच्याकडे मागितलेलं वरदान, ते ही खरं ठरेल की नाही, हे ही काळच सांगेल. आज मी हे लिहीतोय, आजही बहुतेक मुरूडची रेती मऊशार
थंडगार असेल; आजही रात्रीत एखादी कासवीण् अंडे टाकायला
अंजर्ल्याला उतरेल; आजही बाणकोटचा किल्ला निखळता
महाराजांच्या आठवणीत समुद्रावर लक्ष ठेऊन
असेल; आणि आजही एखादं चुकार जोडपं तुटत्या ताऱ्याच्या शोधात आकाश निरखत
असेल, आणि म्हणत असेल “Let this be forever! हा क्षण
असाच राहो!”

तथास्तू!” म्हणत पुण्याच्या आमच्या इवल्याशा घरट्यातून आम्ही दोघे पौर्णिमेचा
पिवळसर चंद्र बघत उभे
असू!      
पंकज
११ मार्च २०२०
बाईक ट्रिपचा दिनांक: १० मार्च २०२० (६००
किलोमीटर्स पुणेदापोलीमुरूडअंजर्लेवेळासहरिहरेश्वर पुणे
बाईक: बजाज डिस्कव्हर ११० सीसी)

ठेवण

सांडलेल्या थेंबांतून कुरणं
फुलताना
फुललेल्या कुरणांतून पिंगाण्यांचे
गाणे;
नि आकाश पिवळसर करून भिंगोऱ्यांचा
नाच
तेव्हा तू, मी, आपण, कधीच
नव्हतो!
स्वर्गतुल्य पृथ्वी करून
संपलेलं चित्र एखादं
आणि कड्या-कपाऱ्यांत कुठे
रंग भरायला
ओढ्या-नाल्यांना काजळ लावायला
तू गेलीस तेव्हा काठावर
उरली सावली!
आपण आपले करत गेलो आणि
उरला अंधार
दिवस संपला की झाला सुरू,
नकळत असा
उरणारा एक उसासा, इथून
टाकला
कुरणांत कुरळ्या गवतांत
अडकून बसला!

पंकज
१६ ऑक्टोबर २०१९

Amazon

यावेळी मात्र तिचे अवयव कापले,
उरलं-सुरलं धडही झाडावर टांगले,

थेंब-थेंब गळून रक्तही साकाळले,
मग एकदाची लावली आग!
ती माझी नव्हती कधीच,
त्याचाही होताच राग,
हक्क पण सांगेन निर्लज्जपणे,
करेन मनोसक्त बलात्कार!
तिच्या काळया-हिरव्या अंगावरती
हजारो मांडली दुकाने बिनधास्त
त्यात चिरडले, मारले, गाडले
पक्षी-प्राणी, झाडं आणि सारेच सगे!
ती तीन आठवडे पेटवूनही
अजून जिवंत कशी?
मी जिंकलो की मी हरलो
हे सांगायलाही नाही माझी आई!
पंकज कोपर्डे 
(२५ ऑगस्ट २०१९)

कविता


तुझ्या चांगल्या वाईट सवयींचा
ठिकाणा हळूवार हरवत चालल्यासारखा होत असताना, मी आताशा घराचे दार उघडून आत पाय ठेवला
तर हवेचा थर तिथल्या तिथे. हालचाल नाही, रंग नाहीसे. अंधाऱ्या रात्री, मिणमिणत्या प्रकाशात,
गच्च पावसात, आभाळ उतरण्याची वाट पाहत आडोश्याला बसलेल्या साठीच्या तेलकट चेहऱ्याच्या
माणसासारखं घर बसलेलं असतं, गच्चीतून तोंड काढून रस्त्याकडे बघत…तुझी वाट बघत!

मी गाडीच्या चाव्या खिळ्याला
अडकवतो, खिशातलं पाकीट ड्रॉवरवर मधे ठेवतो. खांद्यावरचं ओझं खुर्चीवर ठेवतो आणि गच्चीत
येऊन उभा राहतो. सात किंवा असे काहीतरी वाजलेले असतात. लोकं दिसतात…घरा-घरांत खुर्च्यांवर
बसलेली, बसवलेली; चहा पिणारी; टिव्ही बघणारी; येणारी-जाणारी; चित्रातल्यासारखी. तू
नाहीस दिसत. घर घरात जाऊन बसून घेतं, करायला विशेष काहीसं नाही!

थोडं बसावं, एक-दोघांना
फोन करून उगाच त्रास द्यावा, कामाचं बोलावं. करमेनासं होतं. पक्षी आढळत नाहीत, भिंतींवर
अडकवलेले तुझे-माझे फोटोजही बोलत नाहीत. तुझी आठवण येत नाही, त्रास होतो. घरातल्या
फरश्या दररोज मोजल्या तरी तेवढ्याच राहतात आणि तू असताना घर कसं एकदम छोटंसं वाटतं
तेही उमगत नाही! मी घर आवरून ठेवतो. तुला चांगलं वाटेलंसं ठेवतो.

पाऊस थांबल्यासारखा साठीचा
म्हातारा, माझ्याजवळ येऊन बसतो. आम्ही एकमेकांकडे बघतो. मी आम्हा दोघांच्या पेल्यात
मद्याचे पेग भरतो, चिअर्स करत नाही, निमित्त नसतं. घरातला प्रकाश मंदावतो, मी नोराह
जोन्सची गाणी लावतो. आम्ही दोघेही पुन्हा गच्चीत जाऊन उभे राहतो, तोच तो रस्ता बघतो,
आकाशात चंद्र चढलेला असतो. घराला एक आणि मला एक दीड-फुटाची फरशी एवढीच गरज उरते…बाकी
उरतो तो निव्वळ पसारा!

तुझी वाट पाहणारा पंकज
१७ ऑगस्ट २०१९


डास

गोष्ट लिहायला लागलो तेव्हा
मनात आलं तसं लिहीलं, मग मागे वळून पाहण्याचं धैर्य झालं नाही आणि कारणही उरलं नाही.
एक क्षण मनात विचार आला कुठेतरी, कधीतरी, आणि आलं ते कागदावर उतरत राहिलं, उडत, मनसोक्त!
एकेक ओळ लिहीताना जाणवणारा वारा आणि मनातले कारंजे थांबता थांबले नाहीत. एकेक ओळ लिहीताना
मनात जुळणारी लय, कविता, गाणी काही थांबली नाहीत. त्या आनंदात मी जे लिहीलं ते लिहीलं.
ते तेवढ्यावरच माझं मन भागलं कारण त्या-त्या वाक्यांमधे अजून काही उत्कृष्ट करावंसं
जाणवलं नाही. जे जसं लिहीलं तेवढ्यावर पोट भरलं माझं आणि त्याहून अधिक काहीच नाही.
ही प्रक्रिया किती सोपी आहे? जणू उडणारं फुलपाखरू किंवा गाणारा पक्षी एखादा. जणू उन्हात
पडलेली मगर आs वासून किंवा वाहणारी नदी निवांत. घडणारं घडतं आणि तो क्षण तेवढाच अधांतरी
उरतो. त्याला मागे-पुढे काही नाही. त्या-त्या कल्पनांची कादंबरी होत नाही की त्यांचं
लोणचं घातलं जात नाही. एकलकोंड्या अशा कित्येक कल्पना विस्ताराशिवाय पडून राहिल्यात
आणि त्याबद्दल विशेष विवंचनाही कुणाला नसावी! या कल्पनांना पिल्लं होत नाहीत, त्यांची
भूतं होऊन आम्हाला झपाटत नाहीत. त्यांचे लागेबांधे आम्हाला रहात नाही आणि त्यांचे पत्ते…त्यांना
घरं नसतात; भौतिक परिमाणांमधे खिजगणती नसते त्यांची!